वेंगुर्लेत मागील महिन्यात झालेल्या महसूल कर्मचारी क्रीडा स्पर्धेचे ७६ पंच अद्यापही मानधनापासून वंचित


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंच आक्रमक ; आठ दिवसात समस्या न सुटल्यास आ. निलेश राणेंना भेटून व्यथा मांडण्याचा निर्धार
मालवण | कुणाल मांजरेकर

वेंगुर्ले मध्ये १० ते १५ फेब्रुवारी या कालावधीत लाखो रुपये खर्च करून १४ खेळांच्या कोकण विभाग महसूल कर्मचारी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील क्रिकेट वगळता ७६ पंचांना पंच मानधन अद्याप मिळालेले नाही. यामुळे या पंचानी आक्रमक पावित्रा घेतला आहे. शुक्रवारी ओरोस येथे कोल्हापूर विभागीय क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष अजय शिंदे यांच्या समोर पंचानी आपल्या समस्या मांडल्या असून स्पर्धा संपून ३५ दिवस झाले तरीही आपल्या हक्काच्या पंच मानधनापासुन वंचित रहावे लागत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेट स्पर्धेच्या पंचांना अदा केलेल्या मानधनाप्रमाणेच प्रती दिवस एक हजार रुपये मानधन इतर तेरा खेळांच्या स्पर्धेमधील पंचांना मिळाले पाहिजे, यावर सर्व पंच ठाम असून येत्या आठ दिवसांत ही समस्या न सुटल्यास आमदार निलेश राणे यांना भेटून सर्व पंच त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडणार आहेत, अशी माहिती अजय शिंदे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचांची सभा न्यु इंग्लिश स्कूल ओरोस येथे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाने आयोजित केली होती. या सभेत प्रलंबीत मानधनाबाबत नाराजीचा सूर उमटला. स्वतः पंचांनी मैदान आखणी, मैदानावर चुना मारणे, स्पर्धेमधील सामनाधिकारी म्हणून भुमिका चोख बजावली, स्पर्धा संपुन ३५ दिवस उलटले तरीही पंच मानधनचा घोळ काही सुटताना दिसत नाही. सदर स्पर्धेमध्ये मैदानी स्पर्धा, खोखो, कबड्डी, व्हाॅलिबाॅल, बुद्धिबळ, कॅरम, टेनिक्वाइट, बॅडमिंटन, थ्रो बाॅल, फुटबॉल, टेबल टेनिस, जलतरण, लाॅन टेनिस व क्रिकेट अशा चौदा खेळांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. फक्त क्रिकेट स्पर्धेच्या पंचांना पंच मानधन मिळाले असुन उर्वरित तेरा खेळांच्या ७६ पंचांना मानधन मिळेलेले नाही. पंच मानधनाबाबत सर्वानुमते प्रती दिवस प्रती पंच बाराशे रुपये व पंच प्रमुख प्रती दिवस पंधराशे रुपये मानधन एकमुखाने ठरवण्यात आले. पंच मानधन प्रतिदिन प्रती पंच बाराशे रुपये (सकाळी नऊ ते पाच या वेळेसाठी )व पंचप्रमुख मानधन प्रतिदिन पंधराशे रुपये, सकाळी नऊ पूर्वी व सायंकाळी पाच नंतर स्पर्धेचा कालावधी वाढल्यास प्रति पंच तीनशे रुपये अतिरिक्त मानधन ठरवण्यात आले. सर्व पंचांना स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी चहा नाष्टा, दुपारचे भोजन, सायंकाळचा चहा व शुद्ध पिण्याचे पाणी त्याची वेगळी व्यवस्था मैदानावरती करावी लागेल. मैदान आखणीसाठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती 1000/- रुपये मानधन ठरवण्यात आले. पंचाना ड्रेस कोड म्हणून स्काय ब्लू फुल शर्ट, काळी पॅन्ट व संघटनेचे आय कार्ड याची रुपरेषा ठरवण्यात आली.
स्पर्धा संपल्यानंतर सदैव उपेक्षित राहणारा व खेळाडूंच्या नाराजीला सामोरे जाणार्या क्रीडापंचाला विविध खेळांमध्ये वेगवेगळ्या रंगाची कार्ड देउन पंचांना सुरक्षित स्थैर्य देण्यासाठी त्या त्या खेळाच्या राज्य असोसिएशन यांनी प्रयत्न केलेले आहेत. तसेच मैदानावरील सुविधा व पंच मानधन वेळीच देउन पंचांना सन्मान मिळवुन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सदैव पंचांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहुन न्याय मिळवून देऊ असे कोल्हापूर विभागीय कार्याध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी सर्व पंचांना आश्वासित केले.
या सभेत जिल्हा सचिव नंदु नाईक, जिल्हा उपाध्यक्ष विजय मयेकर, कमलेश गोसावी, यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर विभागीय क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या कार्याध्यक्षपदी अजय शिंदे, उपाध्यक्ष पदी मारुती माने ,संघटक पदी अजय सावंत, कार्यकारिणी सदस्य संतोष तावडे यांची निवड झाल्याबद्दल या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन संजय परब, सुदीन पेडणेकर, वैभव कोंडसकर, प्रशांत सावंत यांच्याहस्ते अभिनंदन करण्यात आले. सभेला अजय शिंदे, नंदु नाईक, अजय सावंत, मारुती माने, कमलेश गोसावी, विजय मयेकर, प्रशांत सावंत, संजय परब, श्रीकृष्ण आडेलकर, राजेंद्र तवटे, रवी प्रधान, अजित जगदाळे, सुदीन पेडणेकर, संतोष तावडे, सिद्धार्थ बावकर, वैभव कोंडस्कर, अनिल आचरेकर, अर्जुन माळी, पंकज राणे, श्रीनाथ फणसेकर, विजय सातपुते, व्ही आर घोरपडे, अशोक गीते, मारुती पुजारी, शिवराम सावंत, दिगंबर मोर्ये, प्रविण खडपकर, सिद्राम पाटील, संजय शेवाळे, आर डी केंगले, भाऊसाहेब चवरे, दशरथ काळे, प्रशांत चव्हाण, प्रितम वालावलकर, संदीप नौकुडकर, अमरनाथ राठोड,आर डी चव्हाण हे पंच प्रत्यक्ष उपस्थित होते. तर उर्वरित पंच सभेला ॴॅनलाइन उपस्थित होते. सुत्रसंचलन स्वागत नंदु नाईक यांनी केले. तर वैभव कोंडस्कर यांनी आभार मानले. पंकज राणे या क्रीडा पंचांच्या वडीलांचे देहावसान झाल्याने त्यांना श्रद्धांजली देण्यात आली.

