कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी मी आपल्या बरोबरच !

सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रिमिअर लीगच्या उदघाट्न प्रसंगी आमदार निलेश राणे यांची ग्वाही

कुडाळ : कोल्हापूर खंडपीठ होण्याचा प्रश्न मागील बरीच वर्षे प्रलंबित आहे. हे खंडपीठ होण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील असता. याबाबत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा राज्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अँड. संग्राम देसाई हे नेहमीच माझ्याशी चर्चा करतात. काही दिवसांपूर्वी आंगणेवाडी जत्रेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंदिर परिसरात भेट घेऊन आपण कोल्हापूर खंडपीठाबाबत माहिती दिली होती. कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी मी तुमच्या बरोबर असून तुम्ही फक्त आदेश द्या, तुम्ही सांगाल तसे निलेश राणे करणार, अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे बोलताना दिली.

कुडाळ एमआयडीसी येथील बॅरिस्टर नाथ पै कॉलेजच्या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटना तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोवा राज्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अँड. संग्राम देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच “सिंधुदुर्ग ऍडव्होकेट प्रीमियर लीग २०२५” चे आयोजन करण्यात आले आहे. या शुभारंभ सोहळ्याला कुडाळ-मालवण विधानसभा आमदार  आमदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी स्पर्धेच्या चषकांचे अनावरणही आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग पॉलिटिशियन लीग किंवा महाराष्ट्र पॉलिटिशियन लीग होऊच शकणार नाही. हे फक्त ऍडव्होकेट, डॉक्टर्स करू शकतात. तुमच्या कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन करता की, आम्हाला तुमच्याकडून शिकले पाहिजे. केवळ स्पर्धा किंवा कार्यक्रम करून होत नाही तर त्याचे आयोजन योग्य पद्धतीने होणे आवश्यक असते, असे आमदार निलेश राणे म्हणाले. यावेळी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड संग्राम देसाई, सिंधुदुर्ग जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड परिमल नाईक, ॲड विवेक मांडकुलकर, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, ॲड रूपेश देसाई आदी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4243

Leave a Reply

error: Content is protected !!