संशयित आरोपीच्या शोधात मुंबई पोलीस मालवणात !

मुंबईतील महिलेची सोशल मीडियावर बदनामी केल्याचे प्रकरण ; संशयिताला चौकशीसाठी मुंबईत हजर राहण्याची नोटीस

मालवण : मुंबईतील एका महिलेची सोशल मिडीयावर बदनामी करत धमकी दिल्याप्रकरणी संशयीत आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक शनिवारी मालवणात दाखल झाले. मालवण बाजारपेठ आणि इतर परिसरात संशयीताचा शोध घेण्यात येत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. शहरातील मॅकेनिकल रोड परिसरातील एका मोबाईल शॉपीधारक युवकाला ताब्यात घेत पोलीसांनी थेट मालवण पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी संशयीत युवकाची कसून चौकशी केल्यानंतर तोच संशयीत आरोपी असल्याचे तपासात पुढे आले. यामुळे त्या युवकाला चौकशीसाठी थेट मुंबई याठिकाणी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील एका महिलेने सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टवर संबंधित युवकाने कमेन्ट करत अन्य काही गोष्टींवर भाष्य केले होते. यामुळे सदरच्या महिलेने खानदेश्वर पोलीस ठाणे, नवी मुंबई याठिकाणी तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७९, ३५२, ३५१ (२), ६७अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाच्या तपासासाठी मुंबई पोलीस आज मालवणात दाखल झाले होते. संशयीत आरोपीच्या शोधार्थ पोलीसांनी शहरातील बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी शोध घेतला होता. मालवण पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीसांचेही एक पथक मुंबई पोलीसांच्या पथकाला सहकार्य करण्यासाठी सहभागी झाले होते. एका मोबाईल शॉपीमध्ये कार्यरत असणाऱ्या युवकाला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मोबाईल शॉपीमधील युवकाची चौकशी केल्यानंतर तोच युवक संशयीत आरोपी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. यामुळे पोलीसांनी त्याला नवी मुंबई पोलीस ठाण्यात हजर होण्याची नोटीस दिली आहे. दरम्यान, पोलीस तपासात सदरच्या युवकाने यापुर्वीही अनेकदा अशाप्रकारच्या पोस्ट सोशल मिडीयावर केल्याचेही पुढे आले आहे. एका राजकीय पक्षाच्या चिन्हावरूनही त्याने सोशल मिडीयावर आक्षेपहार्य मजकूर प्रसिद्ध केलेला होता. त्यावेळी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4258

Leave a Reply

error: Content is protected !!