अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी मंदिरात दत्तजयंती निमित्त जय्यत तयारी

दर्शन रांगेची विशेष व्यवस्था ; मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून मंदिरात दत्त जयंती निमित्त जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. दत्त जयंती उत्सव उद्या शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी मंदिरात साजरा होत आहे.

१४ ते १५ डिसेंबर अखेर दत्त जयंती उत्सव व सलग शासकीय सुट्टया यामुळे मंदिरात स्वामीच्या दर्शनाकरीता मोठया प्रमाणात गर्दी होणार आहे. संभावित गर्दी लक्षात घेऊन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती, पोलीस प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने देवस्थानच्या मालकीच्या असलेल्या मुरलीधर मंदिर परिसरात व मंदिराबाहेरील सार्वजनिक परिसरात देवस्थानच्या वतीने कापडी मंडप उभारून व बॅरिकेटिंग करून विशेष दर्शन रांंगेेची व्यवस्था करण्यात आली आहे. दत्तजयंती निमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता भाविकांच्या वतीने होणारे स्वामी समर्थांचे नित्य अभिषेक होणार नाहीत. परगावाहून भांडुप, घाटकोपर – मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदर्गी-गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे. दत्त जयंती निमित्त घाटकोपर मुंबई येथून निघालेला पालखी सोहळा व दिंडी सोहळा आज रात्री ९ वाजता मंदिरात स्वामी चरणी नतमस्तक झाला. याप्रसंगी घाटकोपर येथील शितोळे बाबा चरिटेबल ट्रस्ट दिंडीचे महेश इंगळे यांनी स्वागत करून दिंडी प्रमुख धैर्यशील शितोळे यांचा मंदिर समितीच्या वतीने महेश इंगळे यांनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. तसेच शितोळे बाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनेही मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचा शितोळे बाबा ट्रस्टचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सन्मान केला. दत्तजयंती दिवशी येथील सत्संग महिला भजनी मंडळाचे दुपारी ४ ते ५.३० या वेळेत दत्त जन्म आख्यान, वाचन व भजन करुन सायंकाळी ६ वाजता अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुलाल पुष्प वाहून श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात होईल. 

रविवार दि. १५ डिसेंबर रोजी दुपारी ११.३० च्या नैवेद्य आरतीनंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात येईल. देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद दुपारी १२ ते ३ या वेळेत देण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणुक भजन, दिंडया व वाद्यांसह पार पडणार आहे. श्रींची पालखी मिरवणूक रात्री ९.३० वाजता मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ होईल तरी जास्तीत जास्त भाविकांनी दत्त जन्म सोहळा, पालखी सोहळ्यास उपस्थित राहुन श्रींच्या दर्शनाचा, पालखी सोहळा दर्शनाचा, व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!