सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून २९ ऑक्टोबर पर्यंत मनाई आदेश
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हयातील सण उत्सव, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको या सारख्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोठेही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी या करिता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) (अ) ते (फ) आणि ३०(३) प्रमाणे दिनांक १५ ऑक्टोबर रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २९ ऑक्टोबर रोजी २४.०० वा. पर्यंत मनाई आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी निर्गमित केले आहेत.
या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठया किंवा लाठ्या किंवा शारीरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविल्या जाण्याची शक्यता असते. सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, सभ्यता अगर निती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे याला मनाई राहणार आहे.