मंगेश टेमकर यांची गाव विकासाची तळमळ आणि आ. वैभव नाईक यांची साथ यांमुळे आचरा ग्रा. पं. निवडणुकीतमहाविकास आघाडीचा विजय निश्चित

टेमकरांच्या कन्येचा ठाम विश्वास ; मागील सरपंच निवडणुकीत पप्पांच्या करिष्म्यामुळे नवखी असूनही विजय

पाच वर्षे आचरा ग्रा. पं. विरोधी पक्षाकडे असूनही आ. वैभव नाईकांकडून गाव विकासासाठी भरीव निधी

आचरा | कुणाल मांजरेकर

आचरा ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत मंगेश टेमकर यांना वाढता पाठींबा मिळत आहे. गावातील महिला आणि अन्य नागरिकांचा प्रतिसाद पाहता या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास आचरा गावच्या माजी सरपंच आणि महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर यांच्या कन्या प्रणया टेमकर यांनी व्यक्त केला आहे. मागील ग्रा. पं. निवडणुकीवेळी मी नवखी असताना मला येथील ग्रामस्थानी पप्पांच्या ओळखीमुळे सरपंच पदी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. सरपंच पदाच्या कालावधीत आमदार वैभव नाईक यांनी आम्ही अन्य पक्षात कार्यरत असतानाही गाव विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात असून मंगेश टेमकर यांची गाव विकासाची तळमळ आणि आ. वैभव नाईक यांची समर्थ साथ त्यामुळे मंगेश टेमकर यांच्यासह आचरा ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा विजय सोपा बनल्याचे त्या म्हणाल्या.

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी सरपंच सौ. प्रणया टेमकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना व महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी माजी पं. स. सदस्य निधी मुणगेकर, अनुष्का गावकर, प्रिया मेस्त्री, सुकन्या वाडेकर, पूर्वा तारी, सोनिया तोंडवळकर, लक्ष्मी कुबल, तारामती कोचरेकर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी माजी सरपंच प्रणया टेमकर म्हणाल्या, माझ्या सरपंच निवडणुकीवेळी मला कोणी ओळखत नव्हतं. पण माझ्या बाबांच्या कार्याने प्रभावित असलेल्या जनतेने मला भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्ष मी आचरा ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यभार सांभाळाला. या कालावधीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली. तसेच आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बरेच रस्ते, पायवाटा , पाणी प्रश्न, अंगणवाडी, महिला सक्षमिकरण अशी बरीच कामे पार पडली. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षात मी गावात बरीच कामे करू शकली. वडिलांप्रमाणेच अन्य ग्रामपंचायत सदस्यांचा सपोर्ट मिळाला. त्यामुळे या पाच वर्षात बरीच कामे मार्गी लागली. ग्रामस्थांचे विशेषतः महिलांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. त्यामुळे आता प्रचार करताना महिलांचा, ग्रामस्थांचा विश्वास आमच्यावर आहे हे दिसून येत आहे.

आचरा गावांत पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावात होता. म्हणून पूर्ण गावाची नळ पाणी योजना आम्ही मंजूर करुन घेतली आहे. गावासाठी चार कोटीची योजना मंजूर झाली आहे. हे काम आता प्रगतीपथावर आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याचे काम माझे वडील व निवडून आलेले आमचे सदस्य करतील. या निवडणुकीत आम्ही घरोघरी प्रचारावर भर देत आहोत. लोकांचा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यामुळे आमच्या सर्व उमेदवातांचा तसेच सरपंच मंगेश टेमकर यांचा विजय निश्चित होईल. असा मला विश्वास आहे. बचत गटाच्या माध्यमातून आचरा गावात मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण करण्यात आले. या पाच वर्षात या महिलांना प्रशिक्षण देऊन त्या स्वतःसाठी स्वतः रोजगार निर्मिती करीत आहेत. त्यामुळे महिला वर्गातून मोठ्या प्रमाणात आम्हाला पाठींबा मिळत आहे, असे सांगून मागील पाच वर्षे आम्ही दुसऱ्या पक्षात काम करीत होतो. परंतु आमदार वैभव नाईक यांनी पक्षीय भेदभाव न करता आचऱ्याचे कोणतेही काम लगेच मंजूर करून आचरा गावात मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. त्यामुळे आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत मंगेश टेमकर आणि आमच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे, असे त्या म्हणाल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!