पॉलिटिकलनामा : केसरकर फेल… मतदारांनी केला गेम !
शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना आत्मपरीक्षणाची गरज
भाजपने स्थानिक बळावर मिळवलेले यश उल्लेखनीय
कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग : केवळ विरोधकांवर टीका करून निवडणूका जिंकता येत नाहीत, त्यासाठी मतदारांशी संपर्क ठेवावा लागतो, हे दाखवून दिलं आहे, कसई दोडामार्ग नगरपंचायत मधील मतदारांनी ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतींचा निकाल जाहीर झालाय. या निकालात कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूकीत मतदारांनी शिवसेना आमदार दीपक केसरकरांना स्पष्टपणे नाकारल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी च्या नगरपंचायत निवडणूकीत कसई दोडामार्गात शिवसेनेच्या ५ जागा होत्या. पण आता शिवसेनेचा मुख्यमंत्री सत्तेत असतानाही शिवसेना अवघ्या दोन जागांवर यश मिळवू शकली आहे. भाजपने या नगरपंचायती मध्ये जोरदार मुसंडी मारत १३ जागांवर निर्विवाद यश मिळवलं आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणूकीत शिवसेना आमदार दीपक केसरकर सपशेल फेल गेल्याचं येथे पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायत निवडणूकांचे निकाल बुधवारी हाती आले आहेत. या निवडणूकांचा विचार करता भाजपा आमदार नितेश राणेंनी वैभववाडीचा गड राखण्यात यश मिळवलं आहे. तर देवगड मध्ये भाजपा- शिवसेनेत कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी आ. नितेश राणे यांच्यासह शिवसेना नेते संदेश पारकर यांचीही मेहनत फळाला आली. तर कुडाळ मध्येही त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असली तरी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेला सत्तेच्या पायरीला नेऊन ठेवलं आहे. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे स्थानिक नेते आपापला गड काबीज करण्याच्या स्पर्धेत असले तरी शिवसेना आमदार दीपक केसरकर दोडामार्गच्या निवडणुकीत आपला कोणताही प्रभाव पाडू न शकल्याचे स्पष्ट झाले आहे.
आमदार दिपक केसरकर यांनी यापूर्वी शिवसेना भाजपा युती सरकारच्या काळात राज्यमंत्री पद भूषविले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आमदार केसरकर स्वतःचा मतदारसंघ वगळता उर्वरित जिल्ह्याकडे फारसे लक्ष देत नसल्याची ओरड शिवसेनेतूनच होत असल्याने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करून शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानंतर केसरकरांचा पत्ता कापून त्याऐवजी रत्नागिरीच्या उदय सामंत यांना सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे नाराज असलेले दीपक केसरकर मतदार संघापासून लांब होते. कोरोनाच्या काळात तब्बल दोन वर्षे मतदार संघाची त्यांचा संपर्क जाणवून येत नव्हता. पालकमंत्री असताना निदान स्वतःच्या मतदारसंघावर दीपक केसरकर यांनी पूर्णतः लक्ष केंद्रित केले होते. मात्र पालकमंत्रिपद गेल्यावर आमदार म्हणून मतदार संघावर प्रभाव राखण्यात ते अपयशी ठरले आहे. केवळ निवडणुका आल्या की भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम आखून निवडणुका जिंकण्याचे धोरण केसरकरांनी आखले होते. मात्र त्यांचे हे धोरण मतदारांनी पुर्णतः नाकारले आहे. निवडून यायचे असेल तर मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवावा लागतो, हेच कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणुकीतून मतदारांनी स्पष्ट केले आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायतीचा विचार करता यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये या नगरपंचायती वर शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी ५ नगरसेवक होते. तर काँग्रेस (पूर्वाश्रमीचे राणे समर्थक) ४, राष्ट्रवादी काँग्रेस २ तर एक जागा मनसेच्या ताब्यात होती. मात्र आता झालेल्या निवडणूकीत शिवसेनेला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बळावर जोरदार मुसंडी मारत १३ जागा मिळवित नगरपंचायत ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली असून दोन जागांवर अपक्षांनी यश मिळवले आहे. भाजपच्या विजयासाठी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, मंदार कल्याणकर, प्रवीण गवस, चेतन चव्हाण, संतोष भाळवणकर, पांडुरंग बोर्डेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मेहनत पणाला आली.
शिवसेनेकडे राज्यात सत्ता आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, स्थानिक आमदार पण शिवसेनेचा असताना शिवसेनेला अवघ्या दोन जागा मिळाल्याने स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना जनतेने नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत दोडामार्गमध्ये वर्चस्व मिळवुन आपली पत राखणे आमदार केसरकर यांच्यासाठी महत्वाचे ठरले आहे.
कसई-दोडामार्ग नगरपंचायत निकाल पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र.१ : रामचंद्र मणेरीकर-भाजपा
प्रभाग २ : रामचंद्र सोमा ठाकुर- राष्ट्रवादी काँग्रेस,
प्रभाग क्र. ३ : गौरी मनोज पार्सेकर-भाजपा,
प्रभाग क्र.४ : वासंती मयेकर-शिवसेना ,
प्रभाग क्र.५ : सोनल सुनिल म्हावळणकर -भाजपा,
प्रभाग क्र.६ : रामराम ज्ञानेश्वर गावंकर-शिवसेना,
प्रभाग क्र.७ : देविदास कृष्णा गवस-भाजपा,
प्रभाग क्र.८ : संध्या राजेश प्रसादी-अपक्ष,
प्रभाग क्र.९ : राजेश शशिकांत प्रसादी-भाजपा,
प्रभाग क्र.१० : संतोष नानचे-भाजपा
प्रभाग क्र.११ : नितीन प्रभाकर मणेरीकर-भाजपा,
प्रभाग क्र.१२ : ज्योती रमाकांत जाधव-आर.पी.आय,
प्रभाग क्र.१३ : स्वराली स्वप्निल गवस-भाजपा,
प्रभाग क्र.१४ : क्रांती महादेव जाधव-भाजपा,
प्रभाग क्र.१५ : चेतन सुभाष चव्हाण-भाजपा,
प्रभाग क्र.१६ : सुकन्या सुधिर पनवेलकर-भाजपा,
प्रभाग १७ : संजना संतोष म्हावळणकर-भाजपा.