मालवण न. प. च्या मुख्याधिकाऱ्यांकडून “व्हिजन मालवण” स्मरणिकेचे प्रकाशन ; महेश कांदळगावकर यांची टीका

व्हिजन  नसलेल्या मुख्य अधिकारी यांच्याकडून व्हिजन मालवण स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आल्याचा आरोप

आमच्या काळातील मंजूर झालेल्या कामाचे फोटो छापून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न

मालवण : मालवण नगरपारिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी संतोष जिर्गे यांनी अलीकडेच “व्हिजन मालवण” या स्मरणिकेची छपाई केली आहे. मालवण नगरपरिषदेबद्दल आपल्या विकासाचे व्हिजन काय आहे, त्याची माहिती व फोटो या स्मरणिके मध्ये छापली गेली आहे. यावरून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी टीका केली आहे.  मुख्य अधिकारी यांनी स्वतःच्या संकल्पनेतून  आपल्या प्रशासक कालावधीत ही कामे केली  असती  तर त्याचे कौतुक होणे क्रमप्राप्त होते. पण आम्ही आमच्या कालावधीत  मालवण शहराच्या विकासाचे व्हिजन ठेवून, तसा प्रस्ताव करून आणि त्याला मंजुरी करुन केलेल्या कामाचे फोटो प्रसिद्ध करुन आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न या स्मरणिकेत मुख्य अधिकारी यांनी केला आहे, असा आरोप श्री. कांदळगावकर यांनी केला आहे.   

मुख्य अधिकारी यांनी या स्मरणिकेतील स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत रंगविलेल्या भिंती आणि सामाजिक संस्थेंचा, शाळांचा सहभाग घेवून फोटोसेशन पुरते केलेल्या स्वच्छता मोहिमेचे फोटो सोडून कुठले काम आपल्या संकल्पनेतून केले हे जाहीर करावे.  आणि खरोखरच स्वच्छतेवर काम केले असेल तर मागील तीन वर्षात स्वच्छ सर्वेक्षण मध्ये मालवण नगरपरिषदेचा कितवा क्रमांक आला तेही जाहिर करावे.                   

नेहमी इव्हेंट करणाऱ्या मुख्य अधिकारी यांनी एवढ्या महागड्या छापलेल्या स्मरणिकेची छपाई सुद्धा जाणूनबुजून विधानसभा आचारसंहिता कालावधीत केली. जेणे करुन या कामाचे श्रेय कुठल्याही लोकप्रतिनिधीना जाणार नाही. तसेच ज्यांच्या कालावधीतील कामाचे फोटो छापून बनविलेल्या स्मरणिकेतून  त्याच लोकप्रतिनिधीना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे.  

यापूर्वी मागील तीन वर्षाच्या कालावधीतील आमच्या काळातील मंजूर कामाकडे या प्रशासकाकडून कसा दुर्लक्ष करण्यात आला आहे, याबाबत आम्ही सातत्याने आमची भूमिका मांडत होतो. या बाबतची लेखी निवेदनही  तत्कालीन पालकमंत्री रवीद्र चव्हाण, खासदार नारायण राणे याना दिलेली होती. यामध्ये नगर परिषद भाजी मार्केट,  नगर परिषद आवार येथील अग्निशमन इमारत,  मामा वरेरकर येथील एसी मल्टिपर्पज इमारत यांची अर्धवट कामे, फोवकांडा पिंपळ येथील दोन वर्ष बंद असलेला रंगीत कारंजा,  खत निर्मितीच्या बंद असलेल्या मशिन,  मालवण नगर परिषद पाणी पुरवठा योजनेच्या कामात होत असलेली दिरंगाई,  भुयारी गटार योजनेचे बंद असलेले काम,  मच्छीमार समाजाला गृहीत धरून मासे मार्क़ेट इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या गाळ्यांचे भाडे निच्छित करुन न केलेली लिलाव प्रक्रिया, बायो टॉयलेटच्या अडगळीत पडलेल्या गाड्या, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या दौऱ्याच्यावेळी काढून ठेवलेला बोर्डिंग ग्राउंड येथील हायमास्ट वर्षभर पुनः न लावल्या बद्दल,  विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकत नसलेबाबत,  डास फवारणी बंद असले बाबत, हॉटेल सायबा , गणपती मंदिर आडारी येथील सुशोभिकरण यांच्या देखभाल दुरुस्तीकडे होत असलेले दुर्लक्ष ,  सेल्फी पॉइंटची झालेली दुरावस्था या अश्या अनेक कामाच्या विलंबाबाबत या निवेदनामध्ये उल्लेख केलेला होता.  त्यामुळे जर मुख्याधिकारी याना स्मरणिकाच छापायची होती तर खर तर या विलंबित कामाची छापायला पाहिजे होती. पण या कामांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन आपल्या प्रमोशनसाठी वरिष्ठांकडून गोपनीय अहवालावर चांगला रिमार्क मिळावा या हेतूने अशी स्मरणिका छापून आपल्या कामाची छाप पाडण्याचा हा प्रयत्न केला गेला आहे.                                  

या  स्मरणिकेत आदरणीय पंतप्रधान यांच्या मालवण भेटीच्या वेळी आले होते त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून त्यांच्या वाहनाना अडथळा होऊ नये यासाठी त्तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यावरील गुरे, कुत्रे याना पकडून ठेवण्यात आले होते त्यांचेही  फोटो छापण्यात आले आहेत आणि लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे.  जर आपल्याकडून मागच्या तीन वर्षात ही कुत्रे आणि गुरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली असती तर कमलाकर खोत सारख्या एका जेष्ठ नागरिकांला तीन वेळा उपोषणाला बसण्याची पाळी आली नसती.  आणि आता आमदार निलेश राणे यांनी या तक्रारीची दखल घेतल्यानंतर निविदा काढण्यात आल्या आहेत.                                      

आपल्या मतदार संघातील विकास कामाबाबत सकारात्मकता असेल तर काय होऊ शकते, हे आमचे आमदार निलेशजी राणे निवडून आल्यानंतर बायोटॉयलेटच्या गाड्या, खत निर्मितीच्या मशीन ज्या  प्रशासकीय कालावधीत तीन वर्ष बंद होत्या त्या स्वतःच्या खर्चाने तीन महिन्यात दुरुस्त करून देवून नगर परिषदेला काम कसे केले पाहिजे हे दाखवून दिले आहे. आमचे आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराला चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून डास निर्मूलनासाठी स्वतःच्या खर्चाने दिलेली  फॉगिंग मशिन अडगळीत ठेवणाऱ्या मुख्य अधिकारी यांनी मालवण व्हिजन बद्दल बोलूच नये. कारण व्हिजन हे पुढच्या कामाचे असते. आपण भविष्यात काय करणार,  आपल्या या शहराबद्दल च्या संकल्पना काय आहेत याबद्दल नियोजन करायचे असते  .  लोकप्रतिनिधीनी आपल्या कालावधीत केलेल्या विकास कामाचे  फोटो छापून ते व्हिजन होऊ शकत नाही. त्यामुळे श्रेय घ्यायचेच आहे तर मुख्य अधिकारी यांनी मागील तीन वर्षात लोकप्रतिनिधी नसताना रस्ते, गटारे ही कामे सोडून आपल्या प्रशासक  कालावधीत स्वतःच्या संकल्पनेतून प्रस्ताव तयार करुन  मालवण शहराच्या पर्यटन दृष्ट्या विकासाची किती कामे केली ते जाहीर करावे. आमच्या कालावधीतील आमच्या संकल्पनेतून  मंजुर कामाचे फोटो छापून , शासनाच्या पैशाचा वापर करुन अश्या महागड्या स्मरणिका स्वतःच्या फायद्यासाठी छापण्यात आल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे.  त्यामुळे या अश्या महागड्या स्मरणिका छापण्याचे प्रयोजन काय होते ? आणि यामुळे कुठलेही कारण नसताना या अश्या प्रकारे अनाठाई झालेल्या खर्चा बाबत आमचे आमदार निलेशजी राणे यांचेकडे याबाबत सविस्तर निवेदन करण्यात येणार आहे.  त्याच प्रमाणे त्याना मुख्य अधिकारी यांनी आपले  गोपनीय अहवाल  ज्या वरिष्ठ कार्यालयाला सादर केले आहेत त्या कार्यालयाने मुख्य अधिकारी यांनी त्यांच्या गोपनीय अहवालात सादर केलेल्या कामांची शहानिशा करावी या बाबत संबंधिताना आदेशित करावे  अशी मागणी करण्यात येणार आहे, असे महेश कांदळगावकर यानी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4240

Leave a Reply

error: Content is protected !!