भाजपा मालवण तालुकाध्यक्ष पदी धोंडी चिंदरकर यांची सलग तिसऱ्यांदा फेरनिवड

मालवण शहर मंडल अध्यक्षपदी बाबा मोंडकर 

मालवण  : भारतीय जनता पार्टी मालवण तालुकाध्यक्षपदी पुन्हा एकदा धोंडी चिंदरकर यांची निवड झाली आहे. तालुकाध्यक्ष पदाची हॅट्रिक त्यांनी केली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी प्रमोद रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पार पडली. तर भाजपा मालवण शहर अध्यक्षपदी विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांची निवड करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी संध्या तेरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पुर्ण झाली. 

धोंडी चिंदरकर हे कुशल संघटक आहेत. त्यांना शतप्रतिशत भारतीय जनता पार्टी कारण्यासाठी शुभेच्छा प्रमोद रावराणे यांनी दिल्या. तालुकाध्यक्ष पदाची हॅट्रिक धोंडी चिंदरकर यांनी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायत, खरेदी विक्री संघ, लोकसभा, विधानसभा या सर्वच निवडणुकीत मालवण तालुका मताधिक्यात आघाडीवर राहिला.  वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक जबाबदारी पुर्ण करत असताना सर्वाना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून चिंदरकर यांची कार्यशैली राहिली. प्रसंगी विरोधकांवर आक्रमक शैलीत टिकेचे प्रहार त्यांनी सातत्याने केले. त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना तिसऱ्या वेळी तालुकाध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे. त्या सोबतच मालवण शहर मंडल अध्यक्षपदी विष्णु उर्फ बाबा मोंडकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यांच्याही कामाचा गौरव करण्यात आला.

आपल्या कार्यकालात भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत त्यासोबत आमदार निलेश राणे यांचेही मोठे सहकार्य नेहमीच लाभले. असे सांगत या सर्वांसह सर्व नेते मंडळी यांचे आभार धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर यांनी मानले.

मालवण कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी जेष्ठ भाजपा पदाधिकारी विलास हडकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, माजी उपसभापती राजू परुळेकर यांसह भाजपा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमोद रावराणे, संध्या तेरसे, धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर,  विलास हडकर, अशोक सावंत, विजय केनवडेकर, राजू परुळेकर यांनी विचार मांडले. 

शतप्रतिशत भाजपचा नारा

महिन्या-दोन महिन्यात निवडणुका जिंकता येत नाहीत. सोबत असलेल्या सर्व कार्यकर्ते यांच्या मेहनतीतून तसेच आपल्या सरकारच्या कामातून प्रत्येक निवडणुकीत यश मिळाले. मिळालेले यश सर्व कार्यकर्ते यांचे आहे. भाजपा पदाधिकारी बुथ अध्यक्ष आणि बुथ कमिटी आणि कार्यकर्ते यांच्या कामाचे हे यश आहे. असे यावेळी सांगत शतप्रतिशत भाजपचा नारा देण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4255

Leave a Reply

error: Content is protected !!