श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रम


दुपारी १२ वाजता मंदीरातील ज्योतीबा मंडपात पारंपारीक पध्दतीने स्वामींचा जन्म सोहळा, पाळणा व आरती.
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणार स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे कार्यक्रम पत्रिका पुजन

अक्कलकोट : सालाबादाप्रमाणे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान [मुळस्थान] च्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा सोमवार दि. ३१ मार्च रोजी साजरा होत आहे. या दिवशी श्री स्वामी प्रकटदिन ते श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी पर्यंत अक्कलकोट शहरातून निघणाऱ्या प्रभात फेरीस श्री स्वामी प्रकटदिन रोजी पहाटे ४ वाजता प्रारंभ होईल. पहाटे ५ वाजता श्रींची काकडआरती होईल. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे श्री स्वामी समर्थांचे दर्शन सुलभतेने होणेसाठी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद व अंगारा मिळेल. सकाळी १० ते १२ या वेळेत देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे भजनसेवा होऊन गुलाल, पुष्प वाहिले जाईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता पाळणा कार्यक्रम भजनगीताने संपन्न होवून मंदार महाराज यांच्या वाणीतून प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पाळण्यातील श्रींची आरती होईल. आरती नंतर देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांना पाळणा सोहळ्याचे सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात येईल. दुपारी १२ ते २ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजनकक्ष येथे स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात येईल. यानंतर श्रींचा पाळणा कार्यक्रम झालेला असल्याने मंदिरात नित्य नियमाने रात्री ७:४५ ते ८:४० या वेळेत होणारी श्रींची शेजारती स्वामी प्रकट दिन रोजी होणार नाही.
रविवार दिनांक ३० मार्च रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे पूजन सकाळी ११ वाजता होणार आहे. यानंतर श्रींची नैवेद्य आरती होईल. नैवेद्य आरतीनंतर देवस्थानकडून उपस्थित स्वामी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात येईल. तरी स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन, पाळणा कार्यक्रम, भोजन महाप्रसाद आदी सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

