जिल्ह्यात टक्केवारी, हप्तेखोरी वाढली ; जिल्हा प्रशासनाकडूनच पैसा गोळा केला जातोय…


हप्तेखोरीत नेमकी भागीदारी कोणाची ? माजी आ. परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल
मालवण : जिल्ह्यात सध्या टक्केवारी आणि हप्तेखोरी वाढलेली आहे. हा पैसा जिल्हा प्रशासनाकडून गोळा केला जात आहे. यामुळे यात नेमकी भागिदारी कोणाची आहे, याची कल्पना पालकमंत्र्यांना आहे काय? असा प्रश्न उपस्थित करत उबाठा नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्र्यांच्या कारभारावर तीव्र शब्दात टिका केली. पालकमंत्री फक्त कोट्यवधी रूपयांच्या गोष्टी करताना दिसत आहेत, यामुळे प्रत्यक्षात किती रूपयांचा निधी आणला आणि किती रूपयांचा निधी येण्याची प्रतिक्षा आहे याची माहिती आम्ही माहिती अधिकारात घेऊन जनतेच्या दरबारात मांडू, असा इशारा त्यांनी दिला.

तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, निनाक्षी शिंदे, दिपा शिंदे, नंदू गवंडी, सिद्धेश मांजरेकर, नरेश हुले, भाग्यश्री खान, उपशहरप्रमुख मोहन मराळ, अक्षय रेवंडकर, बाबू टेंबुलकर, सुरेश मडये, करण खडपे, दीपक देसाई, प्रसाद चव्हाण, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते. परराज्यातील बोटींवर कारवाईचा बडगा दाखवून स्थानिक एलईडी आणि बेकायदेशीर असलेल्या पर्ससीन मासेमारीला अभय दिले जात आहे. बेकायदेशीर मासेमारीला मत्स्य व्यवसाय विभागाकडून आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे. यासाठी कोट्यवधी रूपयांची माया गोळा केली जात आहे. हा पैसा कोणासाठी आणि कुठे जात आहे याची चौकशी पालकमंत्री करणार आहेत का? सिंधुदुर्गात बेकायदेशीर वाळू उत्खनन व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे, यासाठी राजकीय मंडळींची माणसे पैसे गोळा करत आहेत, हा पैसा कुठे जात आहे? मटका, जुगार, गोवा बनावटीची दारू विक्री यासारखे व्यवसाय बिनधास्तपणे आणि राजरोसपणे सर्वत्र सुरू आहेत, यांना आशिर्वाद कोणाचा आहे? याकडे पालकमंत्री गांभिर्याने पाहणार आहेत की नाही? असाही प्रश्न श्री. उपरकर यांनी केला. जिल्ह्यातून गोळा होणारा पैसा कुठे जात आहे याचा शोध आम्ही घेत असून लवकरच याची पोलखोल केली जाईल असा इशाराही श्री. उपरकर यांनी दिला.
गत पालकमंत्र्यांनी घालविलेल्या अधिकाऱ्यांना आताचे पालकमंत्री जवळ करताना दिसत आहेत. सिंधुदुर्गात सध्या दोघा पालकमंत्र्यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे. यातून जनतेची कामेच होत नाहीत. ठेकेदार पैसे मिळत नसल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, कंत्राटी कर्मचारी पगार मिळत नसल्याने आंदोलन करत आहेत, पालकमंत्री म्हणून मी कोट्यवधींचा निधी आणल्याचे जाहीर करत आहेत. मात्र प्रत्यक्षात सर्वत्र आलबेल आहे. जिल्ह्यात कोणतीही कामे सुरू नसून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मंजूर केलेली कामे आता सुरू आहेत. यामुळे पालकमंत्र्यांच्या आश्वासनांची पोलखोल लवकरच आम्ही बजेटमधून सिंधुदुर्गाला काय मिळाले हे जाहीर करून करणार आहोत, असेही श्री. उपरकर यांनी सांगितले.

