पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष व संचालक मंडळाची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले स्वागत ; जिल्हा बँकेच्या प्रगतीची दिली माहिती
सिंधुदुर्गनगरी : यापूर्वी ग्राहक राष्ट्रीयकृत बँकांच्या दरवाजात उभे रहात होते. मात्र आता राष्ट्रीयकृत बँका ग्राहकांच्या दरवाजात जाऊन उभ्या रहात आहेत. त्यामुळे आपल्या समोर फार मोठी स्पर्धा असून अशा स्पर्धा युगात आपण मागे राहून चालणार नाही. आपणही ग्राहकसेवेत पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने डोअर स्टेप बँकिंगचा पहिला प्रयोग सुरू केलाय. बँक सखींची नियुक्ती केली आहे. याद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना तसेच जेष्ठ नागरिकांना बँकेची घरपोच सेवा मिळेल. याला ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय. एक मॉडेल म्हणून आम्ही पुढे येतोय. बँकेची २००० कोटीची उलाढाल या तीन वर्षात वाढली असून पुढील दोन वर्षात आणखी दोन हजाराने वाढणार आहोत. एकुण ८००० कोटी व्यवसायाचा टप्पा आम्ही गाठणार आहोत. आमचा जिल्हा छोटा असला तरी आम्ही ज्या पद्धतीने विकासासाठी वेग घेतोय त्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला जो मानसन्मान मिळतो, जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून केले जाते. ज्यांना हा महाराष्ट्र आपले कुटुंब वाटते किंवा सिंधुदुर्ग जिल्हा बँक म्हणून आम्हाला जी मदत ते करतात त्यांचा विसर आम्हाला कधीच पडणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात पूणे जिल्हा बँकेच्या संचालक यांच्यासमोर केले

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील काशिनाथ चांदेरे तसेच संचालक मंडळ यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयास सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने सोमवारी भेट दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी अभ्यास दौऱ्यातील सदस्यांचे स्वागत करुन त्यांना बँकेच्या विविध योजना तसेच बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सर्वश्री रेवणनाथ कृष्णाजी दारवटकर, ज्ञानोबा सावळेराम दाभाडे, दत्तात्रय महादेव येळे, संभाजी नारायण होळकर, भालचंद्र गुलाबराव जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपसरव्यस्थापक सुनिल खताळ, जिल्हा बँकेचे संचालक समीर सावंत, विद्याधर परब, नीता राणे, संदिप उर्फ बाबा परब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे तसेच बँकेचे सरव्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पूणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, सर्व उपस्थित संचालक मंडळ, जिल्हा बँकेचे मुख्य कार्य. अधिकारी या सर्वांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गोमेय मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.