ओरोस येथील जिल्हा रुग्णालय कुडाळ मधील महिला बाल रुग्णालयात कार्यरत करा !
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी
कुडाळच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या टप्पा २ च्या बांधकामासाठी २३ कोटींचा निधी देण्याचीही मागणी
कुडाळ : सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे कार्यरत असलेले जिल्हा रुग्णालय कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय येथे कार्यरत असणारे करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केली आहे. या मागणीला आरोग्य मंत्री ना. सावंत यांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
या निवेदनात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक आरोग्य विभागाने सन २०१३-१४ मध्ये जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम करणेकरीता १४ कोटी रक्कमेला मान्यता दिली आहे. मात्र रुग्णालयाचे सर्व बांधकाम हे मूळ आराखड्यानुसार झाले नाही म्हणून बांधकाम विभागाने २३ कोटी रकमेचे टप्पा २ बांधकामाचे अंदाजपत्रक शासनाला सन २०१८-१९ या वर्षात सादर केले होते. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सदर कामाला प्रशासकीय मान्यता व निधी प्राप्त झाला नसल्यामुळे रुग्णालयाचे काम पूर्ण क्षमतेने सुरु न झाल्याचे समजते. त्यासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, सिंधुदुर्ग कुडाळ रुग्णालयाचे बांधकाम टप्पा ૨ बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता व निधी रु. २३ कोटी या वर्षात मंजूर करून सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांचेकडे वर्ग करण्या करिता सहकार्य करावे तसेच जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग हे जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ सिंधुदुर्ग येथे कार्यरत करणेस शासनाने मान्यता दयावी जेणेकरून कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सेवेसाठी मध्यवर्ती असलेल्या कुडाळ या ठिकाणी जिल्हा रुग्णालय सुरु राहील. त्यामुळे या ठिकाणी जिल्हा रुग्णालय सुरू करावे असे निवेदनात म्हटले आहे. या मागणीला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. ओरोस जिल्हा रुग्णालय या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय झाल्यामुळे कुडाळ येथे जिल्हा रुग्णालय करावे असे त्यांनी म्हटले आहे.