गवा रेडे आता शेतकऱ्यांच्या जीवावर… ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वन विभागाने उपाययोजना हाती न घेतल्यास कायदा हातात घेण्याचा पेंडूर खरारे ग्रामस्थांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेली काही वर्षे गवारेड्यांचा हैदोस सुरू आहे. भातशेती, बागायती, हंगामी शेतीचे गवारेड्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. आता तर हे गवारेडे माणसांच्या जीवावर उठले आहेत. काही दिवसांपूर्वी मालवण तालुक्यातील पेंडूर खरारे या गावातील सुभान सावंत या शेतकऱ्यावर रात्री घरी परतत असताना एका गवारेड्याने हल्ला केला. सुदैवाने त्यांच्या जीवावर बेतले नाही. मात्र त्यांना दुखापत झाली. ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून विभागाने या गवा रेड्यांचा बंदोबस्त न केल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

गेली दोन वर्ष या गवारेड्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यांनी प्रचंड हैदोस घातला आहे. शेती, बागायतीचे नुकसान होत होते. तोपर्यंत शेतकरी गप्प होते. परंतु आता गवारेड्यांनी स्थानिक ग्रामस्थांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी या गवारेड्यांमुळे भयभीत झाले आहेत. काही विद्यार्थी तर या भीतीने शाळेत जाण्यास नकार देऊ लागले आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्या कारणाने पेंडूर गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सुरू असणारी भात शेती तसेच उन्हाळी शेती करणे बंद केले आहे. अनेक वेळा याबाबत प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. परंतु आता एखाद्या शेतकऱ्यांच्या जीववर बेतल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल केला जात आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गवा रेडा हा प्राणी वर्ग १ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला जीवे मारणे हा गुन्हा होऊ शकतो. मग लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर त्याचे काय ? एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतल्यावर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल करत प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करावी असे निवेदन पेंडूर खरारे येथील ग्रामस्थांनी सावंतवाडी वनविभागाच्या मुख्य कार्यालयात जाऊन प्रशासनास दिले आहे. पेंडूर गावामध्ये शेतीचे प्रमाण जास्त आहे. उन्हाळी पावसाळी शेती या गावात मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु वन्य प्राण्यांकडून शेतीची नासधूस होत असल्याने शेतकऱ्यांना फायद्याच्या ऐवजी तोटा जास्त होत आहे. वन्य प्राण्यांपासून झालेल्या नुकसान भरपाईला शासनाकडून अगदी तुटपुंज्या स्वरूपात मदत दिली जाते. ही नुकसान भरपाई शासनाने वाढवून द्यावी अशी देखील मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

सावंतवाडी येथील कार्यालयात उपवनरक्षक यांना लेखी निवेदन सादर करताना पेंडूर खरारे गावातील ग्रामस्थ.

पेंडूर गावात सध्या दोन दूध संकलन केंद्र आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय हा देखील येथील प्रमुख व्यवसाय बनला आहे. परंतु पहाटेच्या वेळी दूध संकलन केंद्रावर पोहोचताना गवारेड्यांची भीती शेतकऱ्यांसमोर असते. काही दिवसांपूर्वी घडलेल्या सुभान सावंत यांच्या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा नेमका काय तो बंदोबस्त करावा, असे लेखी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पेंडूर ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, संजय पेंडूरकर, मुरलीधर सावंत, गजानन सावंत व गव्या रेड्याच्या हल्ल्यात जखमी झालेले सुभान सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत ग्रामस्थांनी गावचे सुपुत्र तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे देखील निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!