कोशारींचा राजीनामा मंजूर ; रमेश बैस महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल !
कोण आहेत रमेश बैस ? झारखंड सरकारशी त्यांचा का सुरु आहे संघर्ष ?
कुणाल मांजरेकर
छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांच्याविरोधात वारंवार अवमानकारक उद्गार काढून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिलेला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अखेर मंजूर केला आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची विरोधकांनी मागणी लावून धरली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याने विरोधकांच्या मागणीला यश आलं आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात अवमानकारक उद्गार काढले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली होती. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. महाविकास आघाडीने राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चाही काढला होता. तसेच राज्यात ठिकठिकाणी राज्यपालांचे पुतळे जाळून आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या हकालपट्टीची जोरदार मागणी केली होती. विरोधकांची मागणी आणि सातत्याने होणारे आंदोलन यामुळे राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदमुक्त करण्याची इच्छा दर्शवित राजीनामा दिला होता. पंतप्रधान कार्यालयाने कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला होता. राष्ट्रपतींनी हा राजीनामा मंजूर केला. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी अखेर पायउतार झाले आहेत.
आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. रमेश बैस यांचा झारखंड सरकारशी गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु होता. त्यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले ‘झारखंड वित्त विधेयक-2022’ दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.