“आंगणेवाडीत आले, खोटं बोलून गेले” ; खा. विनायक राऊतांची निलेश राणेंकडून “पोलखोल” !
मसुरे धरणग्रस्तांसाठी ६.५० कोटीचा मोबदला प्राप्त ; ही रक्कमही शिंदे – फडणवीस सरकारच्या कालावधीतील
प्रकल्पग्रस्तांना कणकवलीच्या रेस्ट हाऊसवर ठेकेदाराकडून दमदाटीचा प्रकार
ठेकेदार आणि विनायक राऊतचा संबंध काय, हे उघड करणार : निलेश राणेंचा इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी अलीकडेच आंगणेवाडी गावाला भेट दिली. या भेटीवेळी आंगणेवाडी नजीक देऊळवाडा येथे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत भूमिपूजन झालेल्या धरणाच्या कामासाठी जमीन मालकांना ११ कोटी रुपये मोबदला आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात जमीन मालकांसाठी साडेसहा कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला आहे. ही रक्कम ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी जमा झाली. यावेळी सत्ता कोणाची होती ? असा सवाल भाजपचे प्रदेश माजी, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात आलेल्या निधीचे श्रेय विनायक राऊत यांनी घेऊ नये, असं सांगून विनायक राऊत यांना नेहमीच खोटं बोलायची सवय आहे. आंगणेवाडीतही ते आले आणि खोटं बोलून गेले, असा आरोप त्यांनी केला. येथील जमीन मालकांना ठेकेदाराकडून धमकावले जात आहे. कणकवलीच्या शासकीय विश्रामगृहावर त्यांना दमदाटीचा प्रकार घडला. हे प्रकार आम्ही सहन करणार नाही. हा ठेकेदार कोण आहे आणि विनायक राऊतशी त्याचा संबंध काय, हे लवकरच उघड करणार, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.
भाजपा नेते निलेश राणे यांनी आंगणेवाडी नजिक भोगलेवाडीच्या माळरानावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आंगणेवाडी मसुरे देऊळवाडा धरणाच्या कामाचे ११ कोटी रुपये आलेत, हा चेक जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झाला आहे, असं विनायक राऊत खोटं बोलले. जिल्हाधिकाऱ्यांकडे जी रक्कम जमा झाली ती ३१ ऑक्टोबर २०२२ ला आली. याठिकाणी पहिला टप्पा साडेसहा कोटींचा जमा झाला आहे. ३१ ऑक्टोबर २०२२ ला सत्ता कोणाची होती ? कोणाची आहे ? विनायक राऊतचा याच्याशी काय संबंध ? उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यंमंत्री होते तेव्हा भूमिपूजन झालं. त्यांनी एक कवडी देखील ग्रामस्थांना दिली नाही. उलट ठेकेदाराकडून ग्रामस्थांना दमदाटीचा प्रयोग झाला. यांचा ठरवलेला कोणतरी ठेकेदार आहे, त्याच्या मार्फत ग्रामस्थांना कणकवलीच्या रेस्ट हाऊसवर दमदाटी केली गेली. आता पैसे जमा झाले ते आमच्या शासनाने जमा केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे चेक जमा झाला आहे. याची त्यांना कुठून तरी माहिती लागली. तेव्हा ते इकडे आले आणि देवीकडे खोटं बोलून गेले. त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा झालेल्या निधीशी काही संबंध नाही. जिल्हाधिकाऱ्याकडे पहिल्या टप्प्याचे साडेसहा कोटी जमा झाले आहेत. हे पैसे आमच्या शासनाकडून जमा झाले. तर त्यात विनायक राऊतचा अधिकार काय ? विनायक राऊत जातात तिकडे खोटं बोलतात. कारण त्यांच्याकडं देण्यासारखं दाखवण्या सारखं काहीही नाही.
आम्ही ग्रामस्थांच्या बाजूने आहोत. विनाटक राऊतने ठेकेदारा कडून कितीही पैसे घेतले असतील, तरी आम्ही ग्रामस्थांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना ठरलेले पैसे त्यांना मिळणारच. उगाच कोण ठेकेदार त्यांना त्रास देत असेल तर आम्ही मंत्रालयात जाऊन हा कोण ठेकेदार आहे, त्याचा आणि विनायक राऊतचा काय संबंध आहे, हे उघड करणार असा इशारा त्यांनी दिला.