आ. वैभव नाईक यांची उद्या रत्नागिरीत लाचलुचपत विभागाकडून चौकशी
सकाळी ११ वाजता चौकशीसाठी रत्नागिरी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस
कणकवली : शिवसेना आमदार वैभव नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उद्या सकाळी पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. प्राथमिक जबाब नोंद करणे, खुल्या चौकशीसाठी पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्या कार्यालयात उद्या ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे या नोटीस द्वारे सुचित करण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून उघड चौकशी क्रमांक ०१ / २०२२ अन्वये आपल्या मालमत्तेच्या अनुषंगाने चौकशी सुरु करण्यात आली आहे. सदर उघड चौकशीच्या अनुषंगाने दिनांक १ जानेवारी २००२ ते २९ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील आपले उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबत मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्म्स त्यामध्ये नमुद मुद्दयांच्या अनुषंगाने त्वरीत भरून देणेसाठी व मत्ता व दायित्वाचे १ ते ६ फॉर्म्स मधील आपण दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपला जबाब नोंद करावा, याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तरी सदर उघड चौकशीच्या अनुषंगाने आपल्याकडे चौकशी करून, आपला प्राथमिक जबाब नोंद करणे आवश्यक असल्याने आपण दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी ११.०० वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे, असे या नोटीसी मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी पोलीस उपधीक्षक सुशांत चव्हाण यांनी म्हटले आहे.