ओसरगाव टोल नाक्याप्रश्नी मालवण व्यापारी संघाने घेतली राज ठाकरेंची भेट

केली “ही” महत्वपूर्ण मागणी ; शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची केली विनंती

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. हा टोलनाका कार्यान्वीत करण्याची तयारी सुरु करण्यात आली असून मालवण दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मालवण व्यापारी संघाने भेट घेत ओसरगांव टोलनाक्याला विरोध दर्शवला आहे. टोलनाका सुरु करायला आमचा विरोध नाही. पण टोल नाक्याची जागा चुकीची असून जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी टोल नाका सुरु केल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता, व्यापाऱ्यांची पिळवणूक होणार आहे. त्यामुळे हा टोलनाका स्थलांतरीत करून जिल्ह्याच्या सीमेवर सुरु करण्यात यावा अशी मागणी मालवण व्यापारी संघाने केली आहे.

कोकण दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मालवणला भेट दिली. यावेळी मालवण व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष नितीन तायशेट्ये, रवी तळाशिलकर, नाना साईल, गणेश प्रभुलकर, वैशाली शंकरदास, हनुमंत शिरोडकर, सरदार ताजर यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते. ओरोस हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. कणकवली, देवगड, वैभववाडी, फोंडाघाटसह अन्य प्रमुख शहर आणि गावातील नागरिक, व्यापारी विविध कामासाठी ओरोसला येतात. त्यांना टोलसाठी नाहक भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे हा टोलनाका जिल्ह्याच्या सीमेवर उभारावा, त्यासाठी आपण पाठापुरावा करावा अशी मागणी व्यापारी संघाने केली. यावर पाठपूरावा करण्याची ग्वाही राज ठाकरे यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!