मालवणात शिवसेनेची निदर्शने : चले जाव चले जाव… “काळी टोपी” चले जाव !
राज्यपालांच्या “त्या” विधानावरून शिवसैनिक आक्रमक ; काळ्या टोप्या जमिनीवर भिरकावल्या
राज्यपालांची वर्तणूक एखाद्या राजकीय पदाधिकाऱ्यासारखी ; त्यांनी पदावरून पायउतार व्हावे : हरी खोबरेकर
मालवण | कुणाल मांजरेकर
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यात संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मालवणात एकत्र येऊन “त्या” वक्तव्या विरोधात जोरदार निदर्शने केली. “चले जाव चले जाव… काळी टोपी चले जाव” अशा स्वरूपाची घोषणाबाजी करत प्रातिनिधिक स्वरूपात आणलेल्या काळ्या टोप्या यावेळी जमिनीवर फेकण्यात आल्या. राज्यपाल या पदाला मान मर्यादा आहेत. हे घटनात्मक पद असताना एखाद्या राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्याप्रमाणे राज्यपाल वागत आहेत. ज्या महाराष्ट्राचे आपण प्रतिनिधीत्व करता, त्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान करणारे वक्तव्य त्यांनी केले असून या वक्तव्याचा मालवण तालुका शिवसेना निषेध करत आहे. राज्यपाल पदावर बसण्याची कोशारी यांची योग्यता नसल्याचे त्यांनी दाखवून दिले असून त्यांनी या पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली.
मालवण शिवसेना शाखेच्या आवारात ही निदर्शने करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवा तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख अमित भोगले, सोमनाथ माळकर, शहरप्रमुख मंदार ओरसकर, राहुल सावंत मीनाक्षी शिंदे, दीपा शिंदे, शिला गिरकर, संमेश परब,आतू फर्नांडिस पंकज सादये, प्रसाद चव्हाण, चंदू खोबरेकर, मोरेश्वर धुरी, बंड्या सरमळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, अक्षय भोसले, संदेश तळगावकर, विशाल सरमळकर, प्रवीण रेवंडकर, भाऊ चव्हाण, जान्हवी खोबरेकर, अमेय देसाई, शशांक माने, गौरव वेर्लेकर, समीर लब्दे, साईप्रसाद साळकर, किशोर कासले, दर्शन महाडगूत, सुरेश मडये, सिद्धेश मांजरेकर, नंदू गवंडी, तपस्वी मयेकर, किरण वाळके, विजय पालव, तेजस लुडबे यांच्यासह अन्य शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, ज्याप्रमाणे देशाचा प्रमुख हा राष्ट्रपती असतो, त्याप्रमाणे राज्यपाल हा प्रत्येक राज्याचा प्रमुख व्यक्ती असतो. असे असताना काल राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाला कमी लेखण्याचे काम केले. त्यांच्या पदाला घटनात्मक अधिकार आहे. परंतु याचा त्यांना विसर पडला असून एखाद्या पक्षाचे पदाधिकारी असल्याप्रमाणे त्यांच्याकडून सातत्याने वक्तव्य होताना दिसत आहेत. शिवसेनेच्या वतीने आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो. महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई नाना शंकर शेठ या मराठी माणसाने घडवली. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मराठी माणसाला स्वाभिमानाने जगायची शिकवण दिली. शिवसेना मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी नेहमीच रस्त्यावर उतरली असून महाराष्ट्राच्या विरोधात कोणीही वक्तव्य करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही. आपले राज्य प्रगतीकडे कसे जाईल, हे पाहणे राज्यपालांचे काम असते. मात्र या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत मराठी माणसाचा अपमान निषेधार्ह आहे. कोशारी यांची राज्यपाल पदावर राहण्याची योग्यता राहिलेली नाही, अशा शब्दात हरी खोबरेकर यांनी टीका केली आहे.