स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम बना, भविष्याचं नियोजन आताच करा…

राणेसाहेबांचा आदर्श घ्या, भविष्यात कितीही मोठे झालात तरी स्वतःच्या मातृभूमीला विसरू नका

माणगाव येथील कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव, निलेश राणेंचे विद्यार्थ्यांना आवाहन

माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत मुलांचा सत्कार

विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने १०५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे झाले वाटप

माणगाव : स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षम बनणे आवश्यक आहे. त्यासाठी भविष्याचं नियोजन आतापासूनच करा. सक्षम बनण्यासाठी भविष्यात कोण होणार याचं नियोजन आताच करा, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी माणगांव येथे बोलताना केले. राणेसाहेब ग्रामीण भागात शिकले. मात्र स्वतःच्या ज्ञानाने राजकीय वाटचालीत मोठा पल्ला गाठत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद पटकावले. राजकारणात मोठं झाल्यानंतरही ते आपली मातृभूमी विसरले नाहीत. अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी भरभरून दिले. त्यांचा आदर्श घेत भविष्यात कितीही मोठे झालात तरी मातृभूमीला विसरू नका, असेही ते म्हणाले.

माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व विशाल परब मित्रमंडळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते विशाल परब, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोरये, संस्था अध्यक्ष सगुण धुरी, दादा साईल, मोहन सावंत, माणगाव सरपंच जोसेफ डान्टस, उपसरपंच दत्ता कोरगावकर, दीपक नारकर, राजा धुरी, रुपेश कानडे, चंद्रशेखर जोशी, दत्ता धुरी, वि. न. आकेरकर, महेश भिसे, सचिन धुरी, केशव भरत, दीपक काणेकर, श्रावण धुरी, मुख्याध्यापक प्रशांत धोंड आदी उपस्थित होते. यावेळी निलेश राणे म्हणाले, आपण ज्या भागातून मोठे झालो, त्या मातीला जागलं पाहिजे याच भावनेतून विशाल परब यांनी केलेले अनेक उपक्रम मी पाहिले असून ते यशस्वी झाले आहेत. यापूर्वी नितेश राणे आमदार होण्यापूर्वी त्यांनी या प्रशालेला आर्थिक सहकार्य केले. मात्र येथील आमदारांनी काय दिलं ? असा सवाल त्यांनी केला. आम्ही सकारात्मक भूमिका घेत संस्थेची उर्वरित कामे पूर्ण करणार असल्याचं आश्वासन देतानाच आज माझ्यासमोर जे तरुण आहात ते देशाचे उद्याचे भवितव्य आहात. त्यामुळे आपण भविष्यात काय बनावं, हे आताच ठरवा. जगाच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे रहाता नये असे शिक्षण संस्थेने द्यावे. भारताची स्पर्धा पाकिस्तान व अफगाणिस्तानशी नसून ब्रिटन, अमेरिका व चीनशी आपली स्पर्धा आहे, असे ते म्हणाले.

तुम्ही घडताना तुम्हाला आपले भविष्य कळले पाहिजे. मी अमेरिकेत शिक्षण घेतले, त्या संस्थेने विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात यशस्वी होईल यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र गाईड नेमला होता व तसे शिक्षण संस्थेने दिले. इमारती उभरण्यापेक्षा विद्यार्थी आपल्या पायावर कसा उभा राहिला पाहिजे, असे शिक्षण संस्थेने दिले पाहिजे. आम्हाला असा प्रश्न पडतो की हा जिल्हा दहावी- बारावीत राज्यात गुणवत्तेत प्रथम असतो. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी कुठे जातात हे समजत नाही. तुम्ही कुठेही शिक्षण घेतले तरी संस्था व शिक्षक यांना विसरू नका. राज्यात जिल्ह्याचे व आपल्या शाळेचे नाव विद्यार्थ्यांनी घडवावे, असे आवाहन निलेश राणे यांनी केले.

कार्यक्रमापूर्वी निलेश राणे यांनी माणगाव हायस्कूल व महाविद्यालयास भेट देऊन तेथील इमारतीची पाहणी केली. तसेच संस्थाचालकांशी चर्चा केली. या कार्यक्रमात विशाल परब यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील किस्से सांगताना माणगाव खोऱ्यातील विद्यार्थी पाठीशी ठाम असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे उद्घाटन निलेश राणे यांनी दीपप्रज्वलन करून केले. यावेळी माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांचा पुष्पहार, शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी विशाल परब मित्रमंडळाच्या वतीने १०५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रशांत धोंड यांनी केले. तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वि. न. आकेरकर यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!