केंद्रात, राज्यात कोणाचीही सत्ता असो, शिवसेनेचे वादळ कोणीही रोखू शकत नाही …!

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा भाजपा नेते निलेश राणेंना इशारा

२०२४ मध्ये वैभव नाईक विजयाची हॅट्ट्रिक करणारच, पराभवाच्या हॅट्ट्रिकसाठी स्वतः उतरायचे की कार्यकर्त्याला उतरवायचे, हे निलेश राणेंनी ठरवावे…

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्यात आमची सत्ता आहे, त्यामुळे आम्हाला रोखू शकत नाही, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी काल नगरपालिकेत केलं आहे. मात्र केंद्रात किंवा राज्यात कोणाचीही सत्ता असो, शिवसेनेचे वादळ कोणी रोखू शकत नाही. वैभव नाईक हे आमसभेचे नव्हे तर आम जनतेचे नेते आहेत. मतदार संघातील गावागावात जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत वैभव नाईक यांच्या समोर कोणाला उभे करणार ? स्वतः निवडणूकीत उतरणार की मागील वेळेत रणजित देसाई सारख्या कार्यकर्त्याला उभे करणार, हे निलेश राणे यांनी जाहीर करावे. वैभव नाईक यांच्या विजयाच्या हॅट्ट्रिक साठी आम्ही शिवसैनिक सज्ज आहोत, तर भाजपने पराभवाच्या हॅट्ट्रिकसाठी तयार रहावे, असे प्रत्युत्तर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

मालवण शिवसेना शाखेत हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते निलेश राणे यांच्या कालच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत, मंदार केणी, मंदार ओरसकर, अमेय देसाई, प्रसाद मोरजकर, गणेश कुडाळकर, किसन मांजरेकर, यशवंत गावकर, दशरथ कवटकर, बंड्या सरमळकर, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

देवदत्त सामंत कोणाच्या पक्षाचे ? त्यांच्यावर कारवाई करणार का ?

शहरातील रस्त्याची कामे अपूर्ण असल्याचे निलेश राणे आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र जवळपास शहरात ५० लाखांची कामे देवदत्त सामंत नामक ठेकेदाराने भरली आहेत. सदरील कामे त्याने अपूर्ण ठेवली असून देवदत्त सामंत कोणाच्या पक्षाचे आहेत आणि त्यांना जाब विचारण्याची हिंमत निलेश राणे दाखवणार का ? असा सवाल हरी खोबरेकर यांनी केला. शहरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे काम रखडले आहे. मात्र हे काम कोणी अडवले ? त्या संस्थेवर कोणत्या पक्षाचे पदाधिकारी आहेत, हे सांगावे. शहरातील गटार खोदाईचे पोटठेकेदार कोण ? ही माहिती निलेश राणे यांनी स्वतःच्या पक्षाच्या माजी नगरसेवकांकडून घ्यावी, असेही ते म्हणाले.

निलेश राणेंकडून वैभव नाईकांच्या कामाचा लेखाजोखा

निलेश राणे काल नगरपालिकेत आले. यावेळी त्यांनी स्वतःच्या तोंडून आमदार वैभव नाईक यांनी शहरात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न केला. वैभव नाईक यांनी शहरात केलेल्या विकास कामांची उजळणी करत या कामांचे गुणगान करण्याचे काम निलेश राणे यांनी केले. निलेश राणे सातत्याने नगरपालिकेत येत राहिले, तर आम्हाला आमच्या कामाची प्रसिद्धी करण्याची गरज राहणार नाही. ५ वर्षात त्यांचे वडील नारायण राणे आजपर्यंत जेवढा निधी नगरपालिकेसाठी आणू शकले नाहीत, तेवढा निधी फक्त आमदार असलेल्या वैभव नाईक यांनी आणून दाखवला, असे हरी खोबरेकर म्हणाले.

… मग आता वैभव नाईक ३५३ ला का घाबरणार ?

२००५, २००९, २०१४ मध्ये नारायण राणे सत्तेतील मंत्री, पालकमंत्री होते. त्यावेळी वैभव नाईक डगमगले नाहीत. मग आता तुमची सत्ता आहे, म्हणून ३५३ ला वैभव नाईक घाबरणार का ? असा सवाल करून एखादा अधिकारी चुकीचा असेल तर त्याला जाब विचारण्यासाठी कोणीही शिवसैनिक मागे हटणार नाही. निलेश राणे यांनी नगरपालिकेला भेट देऊन केंद्रातुन आणलेला निधी खर्च का झाला नाही, हे विचारले असते तर ठीक होते. पण वैभव नाईक यांनीच आणलेल्या निधीबाबत प्रश्न करून वैभव नाईक यांची कार्यक्षमता त्यांनी स्वतः सिद्ध केली आहे, असे हरी खोबरेकर म्हणाले.

वैभव नाईक आमसभेचे नाही, आम जनतेचे आमदार

२०१४ नंतर शिवसैनिकांनी निलेश राणेंचा दोनवेळा पराभव केला, त्यांच्या वडिलांचा पराभव केला, त्यामुळे निष्क्रिय कोण ? हे जनतेने दाखवून दिले आहे. वैभव नाईक हे आमसभेचे नाहीत तर आम जनतेचे आमदार आहेत, तुम्ही मतदार संघात आता फिरता, वैभव नाईक २००९ मध्ये पराभव झाल्या नंतरही थांबले नाहीत. ते मतदार संघात फिरत होते. आज तुम्ही मुख्याधिकाऱ्यांवर आगपाखड केली, पण तुमची पाठ फिरताच त्याच मुख्याधिकाऱ्यांच्या पाठीवर हात कोणी फिरवला, ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या सहकाऱ्यांना विचारावे. तुम्हाला चुकीची माहिती देऊन तुमचेच नगरसेवक तुमची दिशाभूल करीत आहेत. नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचे पोकळ आरोप करण्यापेक्षा ते सिद्ध करा. मागील ५ वर्षात शिवसेनेचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सभापतींनी उत्तमरीत्या काम केले आहे. पालिकेत जनतेला अपेक्षित असलेली विकास कामे केली. शिवसेनेच्या सत्ताकाळात इमारत बांधणीसाठी कोणाला परवानगी मिळवताना त्रास झाला नाही. त्यामुळे शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करू नका, असे हरी खोबरेकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!