असरोंडी उपसरपंचांची सामाजिक बांधिलकी ; “त्या” विद्यार्थ्यांची स्वखर्चाने केली तात्पुरती व्यवस्था
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुक्यातील असरोंडी शाळा नं. १ प्रशालेच्या छप्पराला गळती लागली असून सदरील शाळेच्या छप्पराची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने यंदा पावसाळा सुरू होताच शाळेला गळती लागली. दरम्यान, याची माहिती मिळताच असरोंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मकरंद राणे यांनी तात्पुरता उपाय म्हणून स्वखर्चाने या शाळेच्या इमारतीवर प्लास्टिकचे आवरण घालून दिले आहे.
असरोंडी शाळा नं. १ या शाळेच्या छप्पर दुरुस्ती न झाल्यामुळे शाळेला पूर्णपणे गळती लागली होती. गेले कित्येक महीने जिल्हा व तालुका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून सुद्धा याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामळे यंदा पावसामध्ये शाळेला गळती लागली होती. याची माहिती मिळताच उपसरपंच मकरंद राणे यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत या शाळेच्या छप्परावर प्लास्टीक आवरण घालून दिले. शिक्षणप्रेमी सुर्यकांत सावंत यांनीही या सामाजिक उपक्रमासाठी अर्थिक सहकार्य केले. यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेच्या छप्परावर प्लास्टीक आवरण घालण्यात आले. या शाळेची लवकरात लवकर दुरूस्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.