किनारपट्टीवर पोलिसांचा “वॉच” ; अतिउत्साही पर्यटकांना दिली समज

पर्यटक

दांडी पद्मगड येथे ओहोटीत तयार झालेल्या मार्गावर पर्यटकांनी नेल्या गाड्या

मालवण : मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने वॉच ठेवला जात आहे. रविवारी सायंकाळी समुद्री ओहटी दरम्यान दांडी पद्मगड दरम्यान तयार होणाऱ्या वाळू मार्गावर काही अतिउत्साही पर्यटकांनी आपल्या चारचाकी, दुचाकी गाड्या नेल्या होत्या. काही पर्यटक त्याच ठिकाणी समुद्रात उतरून समुद्रीस्नान करत होते. दरम्यान, डीवायएसपी विनोद कांबळे, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखल होत सर्व पर्यटकांना समज देत पर्यटकांच्या गाड्या त्या ठिकाणाहून बाहेर काढायला लावल्या.

भरती दरम्यान पाणी वाढल्यास त्या ठिकाणी पर्यटक अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पर्यटकांनी अतिउत्साही पणे वाळू मार्गावर गाड्या आणू नये, असे आवाहन या निमित्ताने पोलिसानी केले आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्रात लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. तरी पर्यटकांनी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी. लहान मुले खोल समुद्रात जाणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी. यासह अन्य खबरदारी सूचना किनारपट्टी भागात गस्त घालून पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने दिल्या जात होत्या.

पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सर्व किनारपट्टी भागात लक्ष ठेवून आहेत. पर्यटकांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची असून त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात असल्याचे पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!