वैभववाडीतील सोनाळी सोसायटीवर भाजपाचा झेंडा ; शिवसेनेचा धुव्वा
भाजपा पॅनेल प्रमुख अरविंद रावराणे विजयाचे शिल्पकार ; यापुढील सर्व निवडणूकीत १०० % विजय भाजपाचाच
वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथील ग्रामसेवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपा विरुद्ध शिवसेनेच्या पॅनलमध्ये ही निवडणूक झाली. या निवडणुकीत सेनेला चारीमुंड्या चित केले आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत भाजपाने १३ पैकी १० जागांवर विजय मिळविला तर शिवसेनेला केवळ ३ जागा जिंकता आल्या.
पॅनेलचे प्रमुख, माजी सभापती अरविंद रावराणे यांचे आ. नितेश राणे व भाजपा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. पावणादेवी ग्राम विकास सेवा पॅनेल (भाजपा पुरस्कृत) तर परिवर्तन ग्रामविकास सेवा पॅनेल (शिवसेना पुरस्कृत) यांच्यात लढत झाली. भाजपा विजयी उमेदवारमध्ये अरविंद भास्कर रावराणे, प्रशांत भिकाजी पवार, संजय लक्ष्मण साळसकर, सचिन राजाराम कोदे, समाधान तुकाराम जाधव, प्रकाश मारुती शेलार, शितल गजानन गुरव, शारदा बाळकृष्ण तळेकर, प्रवीण तानाजी भोसले, रवींद्र गुलाबराव चव्हाण यांचा समावेश आहे. इतर विजयी उमेदवार मध्ये अशोक शिवाजी रावराणे, संदिप शांताराम शिंदे, विश्वनाथ गणपत पवार यांचा समावेश आहे.
सोनाळी येथे बुधवारी निवडणूक शांततेत पार पडली. सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भाजपाने १३ पैकी १० जागांवर विजय मिळविला आहे. विजयानंतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विजयी जल्लोष केला. यावेळी संतोष कोलते, मनोहर तळेकर, समाधान गुरव, रमेश पवार, रवी शेलार, शांतेश रावराणे, दिपक कारेकर, संतोष सुतार, संतोष शिरावडेकर, मनोहर गुरव, मारुती पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नुतन संचालक यांचे गावात अभिनंदन केले जात आहे.
पॅनेलप्रमुख अरविंद रावराणे म्हणाले, या विजयानंतर विरोधकांना आपली जागा समजली असेल. गावचा विकास हा केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातूनच झाला आहे. हे या विजयातून ग्रामस्थांनी दाखवून दिले. या पुढील सर्व निवडणुकांमध्ये १०० टक्के विजय हा भाजपाचा असेल असं सांगितलं. या निवडणुकीत परिश्रम घेणाऱ्या सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अरविंद रावराणे यांनी आभार मानले.