राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालवण शहराध्यक्षपदी सतीश आचरेकर यांची निवड

आगामी नगरपालिका निवडणूक आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली ; जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती

मालवण शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट करण्यासाठी काम करणार : सतीश आचरेकर

मालवण : राष्ट्रवादी काँग्रेस मालवण शहराध्यक्षपदी युवा सामाजिक कार्यकर्ते सतीश आचरेकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी बुधवारी मालवण येथील हॉटेल चिवला बीच मध्ये आयोजित बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे./आगामी नगरपालिका निवडणूक सतीश आचरेकर यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले. तर पक्षाने मोठ्या विश्वासाने आपल्यावर ही जबाबदारी दिली असून आगामी मालवण नगरपालिकेत शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी अस्तित्व दाखवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही सतीश आचरेकर यांनी दिली आहे.

येथील हॉटेल चिवला येथे तालुका राष्ट्रवादी क्राँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत प्रदेश संघटन सचिव काका कुडाळकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्‍वास साठे, माजी उपसभापती नाथ मालोंडकर, आगोस्तीन डिसोझा, प्रमोद कांडरकर, संदेश फाटक, माजी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, सुधीर धुरी, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सदानंद मालंडकर, सलीम खान, अशोक पराडकर, बाबी वायंगणकर, विनोद जाधव, अभी घाडीगावकर, प्रकाश भोसले, नामदेव गिरकर, हरिश्‍चंद्र परब, तुळशीदास चव्हाण, अ‍ॅड. सदफ खटखटे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अमित सामंत म्हणाले, सतीश आचरेकर यांच्यासारखे डॅशिंग युवा नेतृत्व मालवण शहरात राष्ट्रवादी संघटना वाढवण्यास निश्चितच मोलाची भूमिका बजावेल. आगामी नगरपालिका निवडणुकीत सतीश आचरेकर यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. यापुढे पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी व मंत्री यांचे पूर्ण पाठबळ सतीश आचरेकर यांना असणार आहे. मंत्रालय स्तरावरून जास्तीत जास्त विकासनिधी मालवण शहरात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचेही अमित सामंत यांनी सांगितले.

यावेळी सतीश आचरेकर म्हणाले, पक्षाने शहराध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी सर्व सहकार्‍यांना सोबत घेत यशस्वीरित्या पार पाडणार आहे. शहरात जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकारी, मंत्री यांच्या माध्यमातून आणण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. येत्या काळात पालिकेची निवडणूक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पक्षाकडून जो आदेश येईल त्यानुसार जोमाने काम केले जाईल. आघाडी म्हणून निवडणूक लढवली गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाटपात योग्य तो सन्मान मिळवत शहरात राष्ट्रवादी अधिक मजबूत करणे. यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आचरेकर यांनी स्पष्ट केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!