निलेश राणेंच्या वाढदिनी बेरोजगार तरुणाईला “लॉटरी” ; ५४५ जणांना तात्काळ नोकरी
कुडाळ मधील रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १६८३ जणांची उपस्थिती ; ३०० जणांना जॉबकार्ड्स
कुणाल मांजरेकर
कुडाळ : भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिनी कोकणातील बेरोजगार तरुणाईला “लॉटरी” लागली आहे. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ मध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात तब्बल ५४५ जणांना तात्काळ नोकरी उपलब्ध झाली असून ३०० जणांना जॉब कार्ड्स देण्यात आले. त्यांना नजीकच्या काळात नोकरी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस गुरुवारी ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मात्र या सर्व उपक्रमात आकर्षण होतं ते कुडाळ मध्ये निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला भव्य रोजगार मेळावा ! दोन वर्षांपासून कोरोना महामारीचं संकट अवघ्या जगासमोर उभं ठाकलं आहे. यामध्ये अनेक कंपन्या बंद पडल्या असून हजारो युवकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. परिणामी त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आर्थिक संकट ओढवलेल्या कोकणातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे त्यांच्या वाढदिनी गुरुवारी भव्य रोजगार महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन करतांनाच केवळ जॉब लेटर देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी अट निलेश राणे यांनी सहभागी कंपन्यांना घातली होती. त्यानुसार गुरुवारी कुडाळ मध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या मेळाव्याला एकूण १६८३ उमेदवारांनी उपस्थिती लावली. त्यामध्ये तब्बल ५४५ जणांना जॉब लेटर देण्यात आले. त्यांना तात्काळ रोजगार देण्यात आला आहे. तर ३०० जणांना जॉब कार्डस् देण्यात आले. त्यांना कंपन्यांमध्ये उपलब्ध होणाऱ्या जॉब नुसार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कोकणातील बेरोजगार तरुणांना नवीन रोजगार निर्माण व्हावेत, यासाठी आमचे प्रयत्न चालू राहतील, अशी प्रतिक्रिया माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.