आ. नितेश राणेंचा जामीन फेटाळला ; जिल्हा न्यायालयात हायहोल्टेज ड्रामा !
माजी खासदार निलेश राणेंची पोलिसांसमवेत बाचाबाची ; न्यायालयात वातावरण तणावपूर्ण
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दहा दिवस आ. राणेंना अटकेपासून संरक्षण : निलेश राणेंची भूमिका
सिंधुदुर्ग : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने अखेर फेटाळला आहे. दरम्यान, हा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आ. नितेश राणे यांच्या गाडीसमोर पोलिसांनी कडे केल्यानंतर जिल्हा न्यायालयाच्या आवारात हायहोल्टेज ड्रामा रंगला. भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पोलिसांना जाब विचारल्यानंतर या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणेंना दहा दिवस अटकेपासून संरक्षण दिले आहे, त्यामुळे ही मुदत पूर्ण होईपर्यंत पोलीस नितेश राणे यांना अटक करू शकत नाहीत, असा मुद्दा निलेश राणे यांनी उपस्थित केला. अखेर या घटनेनंतर आ. नितेश राणे जिल्हा न्यायालयातून कणकवलीच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर नितेश राणे यांना अटक होणार की आणखी काही दिवस अटकेपासून संरक्षण मिळणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर आ. नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तिथे त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली. तिथेही हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर राणेंनी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र, तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सुप्रीम कोर्टानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळत त्यांना दहा दिवस अटकेपासून संरक्षण देत पुन्हा सत्र न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आ. राणेंच्या जामीन अर्जावर काल आणि आज सुनावणी पार पडली. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयानेही राणेंचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणात जामीन फेटाळल्यामुळे आता नितेश राणे पुन्हा एकदा हायकोर्टात जायची तयारी करत आहेत. मात्र, दुसरीकडे नितेश राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर मंगळवारी सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नितेश राणे यांचा जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे हेही आक्रमक पवित्रा घेताना दिसून आले. त्यामुळे वातावरण तापले. मला कायदा शिकवू नका, अशी आक्रमक प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली. शिवाय निलेश राणे आणि पोलिसामध्येही बाचाबाची झाली. पोलिसांनी गाडी थांबवली म्हणून निलेश राणे यांच्या रागाचा पारा चढला. त्यांनी यावरून सवाल उपस्थित केला. पोलिसांनी गाडी थांबवल्यानंतर नितेश गाडीतून खाली उतरले आणि कोर्टात गेले. त्याआधी त्यांनी आपल्या वकिलांशीही चर्चा केली. त्यानंतर आमदार राणे जिल्हा न्यायालयाच्या आवारातून कणकवलीच्या दिशेने रवाना झाले.