गोव्यास जाऊन रात्रीचा खेळ चाले करून, ५२ पत्त्याचं पुस्तक वाचून देशाचा, राज्याचा जीडीपी कळत नाही…
भाजप जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांची संदेश पारकर यांच्यावर टीका ; राणे साहेबांवर केलेली टीका सहन करणार नाही
कणकवली : गोव्याला जाऊन रात्रीचा खेळ चाले करून, ५२ पत्त्याच पुस्तक वाचून देशाचा, राज्याचा जीडीपी कळत नसतो. त्यासाठी विधानसभा, लोकसभा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास लागतो. हे उबाठा उमेदवार संदेश पारकर यांनी लक्षात ठेवले पाहिजे. संदेश पारकर यांनी राणे कुटुंबावरील टीका थांबवावी. राणेसाहेब आमचे दैवत आहेत, त्यांच्यावर केलेली टीका आम्ही सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली.
माझ्यावर कुठल्या बँकेचे थकीत कर्ज नाही. मला गोव्याला जायची सवय नाही. मला डान्सबार मध्ये जायची सवय नाही. मी फॉर्चूनर सारख्या गाड्या बदलत नाही. राणेसाहेबांनी मला काय दिले याच्यापेक्षा जिल्ह्याला काय दिले याला मी महत्त्व देतो. राणेसाहेब हे व्यक्ती नसुन महान विचार आहेत. त्यांच्या विचारांची जीवन ज्योत आम्हाला आशेचा किरण दाखवते. सर्वसाधारण माणूस प्रतिकूल परिस्थितीवर मात करू शकतो हा विचार प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करणारे दादा खंगलेल्या माणसाला कार्य प्रवृत्त केल्याशिवाय राहत नाहीत.
संदेश पारकर तुम्ही किती सामर्थ्याचा आव आणला, तरी तुमची आणि तुमच्या बरोबर प्रचार करणाऱ्यांची लोकप्रियता मतदाराने ओळखली आहे. आता राणे साहेबांवर टीका करण्यापेक्षा तुम्ही मतांची भिक मागा अजुन वेळ गेलेली नाही. मागील नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नाईक आणि पारकर कुटुंबाकडून कणकवलीचे स्वयंभु देवस्थानचे प्रमुख यांनी तयार केलेल्या गाव पॅनलला गोड बोलुन दगा दिला होता. आम्ही स्वाभिमान पक्ष म्हणुन लढलो होतो आणि तुमचा पराभव केला होता. आता तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर लढत आहोत. तेव्हा तुमचा पुन्हा पराभव करणार यात शंका नाही असा विश्वास सुरेश सावंत यांनी व्यक्त केला.