महाविकास आघाडीच्यावतीने उद्या ओरोस येथे “ढोल बजाओ, आरोग्य यंत्रणा सुधारो” आंदोलन

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर होणार आंदोलन

मालवण : ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील भोंगळ कारभाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने उदया सोमवार दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर “ढोल बजाओ आरोग्य यंत्रणा सुधारो” आंदोलन छेडण्यात येणार आहे.

“आला पेशंट की पाठवा गोव्याला” अशी काहीशी दुरावस्था सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजची झालेली आहे. कोणताही पेशंट आला की गोव्याला पाठविण्याच्या पलीकडे कोणतेही काम शासकीय मेडिकल कॉलेज करत नाही. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे -फडणवीस सरकारकडून भोंगळ कारभार सुरु आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे महाविद्यालय मंजूर केल्यानंतर गेल्या तीन वर्षात शिंदे -फडणवीस सरकारने शिक्षक भरती केलेली नाही, नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीत, वसतीगृहाची व्यवस्था केलेली नाही, अपुरे कर्मचारी वर्ग, अपुरा औषधपुरवठा, सिटीस्कॅन मशीन बंद, शस्त्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा शिंदे -फडणवीस सरकारचा प्रयत्न असून याविरोधात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उद्या सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर “ढोल बजाओ आरोग्य यंत्रणा सुधारो”आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!