अन् “त्या” आज्जीच्या घराला पडलेला पाण्याचा वेढा सुटला !
माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शिल्पा खोत यांचे आदर्शवत सेवाकार्य
मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे खोत दाम्पत्याने मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहर आणि परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून धुरीवाडा बोरकर गल्ली येथे राहणाऱ्या संगीता हळदणकर या वयोवृद्ध आज्जीच्या घराला देखील पाण्याचा वेढा पडल्याने त्यांना घरातून बाहेर येणे मुश्किल बनले होते. ही बाब मालवण नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत आणि युवती सेनेच्या कुडाळ मालवण विधानसभा समन्वयक सौ. शिल्पा खोत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी पालिकेच्या माध्यमातून येथे साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करून दिला. खोत दाम्पत्याच्या विनंती नुसार बुधवारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी स्वतः कर्मचाऱ्यांसह याठिकाणी येऊन जेसीबीच्या सहाय्याने येथील पाण्याला मोकळी वाट करून दिली. यामुळे श्रीमती संगीता हळदणकर यांनी यतीन खोत, शिल्पा खोत यांचे आभार मानले. तर प्रशासनाने दाखवलेल्या तत्परते बद्दल खोत दाम्पत्याने मुख्याधिकारी व पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.
धुरीवाडा येथील या भागातील रस्त्याचे अलीकडे नूतनीकरण झाले आहे. त्यामुळे येथील रस्ता उंच झाला असून परिणामी श्रीमती हळदणकर यांच्या अंगणात पावसाचे पाणी येऊन त्यांचा घराबाहेर येण्याचा मार्ग बंद झाला होता. याची माहिती मिळताच यतीन खोत, सौ. शिल्पा खोत या चार दिवस येथे येथून येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग काढत होत्या. अखेर आज पालिकेचा जेसीबी बोलावून येथील पाण्याला मार्ग काढण्यात आला. या साठी सहकार्य करणाऱ्या मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्यासह महेश परब, सोनाली हळदणकर, राजा केरीपाळे, श्री. वळंजू यांचे यतीन खोत, शिल्पा खोत यांनी आभार मानले आहेत. पालिका प्रशासनाकडून सदैव शहरातील कोणत्याही समस्येच्या सोडवणुकीसाठी मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.