Malvan | बोर्डिंग ग्राउंडच्या दुरावस्थेविरोधात आ. वैभव नाईक आक्रमक !

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यावेळी टोपी वाला हायस्कुलच्या बोर्डिंग मैदानावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. पंतप्रधानांचा दौरा आटोपल्यानंतर हे हेलिपॅड काढून मैदान पुन्हा सुस्थितीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अदयापही याची कार्यवाही झालेली नाही. येत्या मंगळवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत बोर्डिंग ग्राउंडच्या दुरुस्तीसाठी ठोस निर्णय न झाल्यास ठाकरे शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ४ डिसेंबरच्या मालवण दौऱ्यासाठी मालवणात तात्पुरत्या स्वरूपात ३ हेलिपॅड उभारण्यात आली होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे ४ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले होते. त्यातील एक तात्पुरते हेलिपॅड मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर उभारण्यात आले. बोर्डिंग ग्राउंड हे मालवणच्या अस्मितेचे ग्राउंड आहे. ग्राऊंडची देखभाल करणाऱ्या लोकांनी मेहनत घेऊन हे ग्राउंड सुस्थितीत ठेवले होते. हेलिपॅडमुळे ग्राउंडची दुरावस्था झाली आहे. मोदीजींच्या दौऱ्यानंतर हेलिपॅड काढून बोर्डिंग ग्राउंड पुन्हा सुस्थितीत करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी आपले आश्वासन पाळले नाही. चार चार कोटी रुपये हेलिपॅडसाठी खर्च केले जातात. या हेलिपॅडच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ही बाब आहेच, त्याचबरोबर ग्राऊंडच्या दुरुस्तीवरून देखील अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत. आमदार वैभव नाईक यांनी आज शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत मालवण बोर्डिंग ग्राउंडची पाहणी केली. याप्रसंगी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, शहरप्रमुख बाबी जोगी, सन्मेष परब, भाई कासवकर, उमेश चव्हाण, मनोज मोंडकर, सच्चीदानंद गिरकर, उमेश मांजरेकर, किशोर गावकर, दिलीप चव्हाण, बंड्या सरमळकर, आशुतोष पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा नियोजनची सभा येत्या मंगळवारी आहे. जर या सभेत ग्राऊंडच्या दुरुस्तीचे  काम मंजूर झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!