विनापरवाना काडतूसाची बंदुक व जिवंत काडतुसे बाळगल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता
आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहीले
मालवण : विनापरवाना सिंगल बॅरल काडतुसाची बंदुक व ४ जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी अजित मोहन गोळवणकर (वय ३२, रा. गोळवण ता. मालवण) याची मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी. तिडके यांनी सबळ पुराव्याअभावी गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे ॲड. स्वरूप नारायण पई यांनी काम पाहिले.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा ओरोस यांनी २२ मार्च २०१९ रोजी आरोपीच्या गोळवण मालवण येथील घरात छापा टाकून विनापरवाना सिंगल बॅरल काडतुसाची बंदुक व ४ जिवंत काडतुसे जप्त करून आरोपी विरूध्द मालवण पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ (१) अ अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीसांनी आरोपीविरूध्द तपासकाम करून मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांचे न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलेले होते. याकामी सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीचे व साक्षीदारांचे जबाबातील विसंगती, तपासकामातील त्रुटी व आरोपीतर्फे करण्यात आलेला युक्तीवाद विचारात घेवून मालवण येथील मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.