डबक्यात राहणाऱ्यांनी लायकीत राहून सुदेश आचरेकरांवर बोलण्याचं धाडस करावं …

सुदेश आचरेकर यांच्या समर्थनार्थ दादा वाघ मैदानात ; बाबी जोगी यांच्यावर जहरी टीका

सकाळी उद्धव सेना तर संध्याकाळी शिंदेंच्या शिवसेनेसोबत राहून केसरकरांना खबऱ्या पोहोचण्याचे बाबी जोगींचे काम

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पक्ष हा महासागरच आहे. तर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर हे या महासागररुपी भाजप पक्षातील दर्यावर्दी नेते आहेत. त्यामुळे त्यांना बुडण्याची भीती नाही. मात्र ठाकरे गट सध्या डबके बनला असून केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आचरेकर यांच्या सारख्या लोकमान्य नेत्यावर नाहक टीका केल्यास ठाकरे गटाचे शहरप्रमुख बाबी जोगी नक्कीच त्या डबक्यात बुडून जातील. त्यामुळे सुदेश आचरेकर यांच्यावर बोलताना लायकीत राहावे, अशी बोचरी टीका भाजपचे माजी शहरप्रमुख दादा वाघ यांनी प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून केली आहे.

सुदेश आचरेकर हे बोलतात त्या प्रत्येक गोष्टीला संदर्भ असतो. त्यांची कार्यतत्परता त्यांनी सलग सहा वेळा मालवण नगरपालिकेत विजयी होऊन दाखवली आहे. ते स्वयंप्रकाशित आहेत. नेहमी पक्षासाठी व जनसेवेसाठी वाहून घेतलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कोरोना काळात त्यांनी दिवसरात्र काम केले. अनेक रुग्णांना आधार दिला. तोक्ते वादळात सर्वत्र नुकसान स्थितीत लाईट व अन्य सेवा सुरळीत होण्यासाठी त्यांनी सतत काम केले. तोक्ते वादळ असो अथवा कोरोना काळ संकटकाळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते हेच प्राधान्याने जनतेसोबत होते. असे असताना तोक्ते वादळाच्या दोन वर्षानंतर केवळ सहानुभूती निर्माण करण्यासाठी ठाकरे गट प्रयत्न करत आहे. मात्र जनता सुज्ञ आहे.

९ वर्ष आमदारकी काळात वैभव नाईक अपयशी ठरले. देवबाग वीज प्रश्न, मालवण शहरातील रखडलेली व अर्धवट सांगाडा स्थितीतील विकासकामे हे ठाकरे गट व आमदारांचे अपयश आहे. यासह अन्य विषयावर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी यांनी सडेतोड भूमिका मांडली हे ठाकरे गटाच्या अस्तित्व नसलेल्या प्यादे स्वरूपातील बाबी जोगी यांना झोम्बले असावे. यासह सोशल मीडियात टीका टिप्पणी करणाऱ्या तपस्वी मयेकर यांनाही मिरची झोम्बली. मात्र वस्तुस्थिती आहे तीच राहणार.

मालवण शहरातील विकास पाच वर्षात रखडला. मात्र मागील वर्षात विकासकामांनी गती पकडली. फायर फायटर, पालिका सुशोभीकरण व अन्य विकासकामे झाले. गटार खोदाई काम चांगल्या पद्धतीने झाले. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. भाजप शिवसेना सरकारच्या माध्यमातून पालिकेला निधी मिळाला. यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ठाकरे गट कोणताही विषय काढून संभ्रम निर्माण करत आहे. प्रत्यक्षात यांचे आमदार अपयशी ठरल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत. देवबाग वीज प्रश्न आमदार वैभव नाईक यांच्याच मुळे निर्माण झाला. प्रश्न सोडवण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागले. गुन्हे अंगावर घ्यावे लागले. त्यावेळी मार्ग निघाला. मात्र त्यावर लक्ष न देता पंचायत समिती व अन्य ठिकाणी स्टंट आंदोलन करण्याचे काम आमदार करत आहेत. मात्र त्या आंदोलनातही बाबी जोगी मागे मागे होते. कारण सकाळी उद्धव सेने सोबत तर संध्याकाळी शिंदे शिवसेने सोबत मंत्री दीपक केसरकर यांच्या संपर्कात राहून त्यांना माहिती पोहचवण्याचे काम बाबी जोगी करत आहेत. काहीवेळा तर कोळंब पुलाखाली चिरीमिरी साठी ते थांबतात अशाही चर्चा रंगल्या. अश्या जोगीनी आपण तोंडघशी पडू अशी वक्तव्य करू नये, असा टोला दादा वाघ यांनी प्रसिद्धीपत्राच्या माध्यमातून लगावला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!